छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीवरून पालकमंत्री संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत जिल्हा नियोजनच्या बैठकीपूर्वी पालकमंत्री यांच्याकडे विचारणा केली असता राजेंद्र जंजाळ उपमहापौरच काय मुख्यमंत्री व्हावेत, अशी खोचक टीका त्यांनी केली.
मनपाच्या निवडणुकीपूर्वीपासून पालकमंत्री शिरसाट आणि जंजाळ यांच्यात जुंपली आहे. महापालिकेच्या तिकीट वाटपात डावलल्यानंतर जंजाळ यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर जंजाळ हजारो समर्थकांसह शिरसाट यांच्या बंगल्यावर चालून गेले होते. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी करीत काही काळासाठी वाद मिटविला. निवडणुकीत शिंदेसेनेला चांगले यश मिळाले. त्यामुळे उपमहापौर शिंदेसेनेचा होणार हे निश्चित होते. परंतु उपमहापौरपदी जंजाळ यांच्या नियुक्तीला शिरसाट यांचे समर्थन नव्हते. मात्र, जंजाळ यांच्या नियुक्तीसाठी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांनीच सांगितल्याने शिरसाट यांचा नाईलाज झाला. दोन दिवसांपूर्वी उपमहापौरपदी जंजाळ यांची निवडही झाली. यावेळी पालकमंत्री शिरसाटही उपस्थित होते. परंतु या निवडीबद्दल ते नाराज असल्याची चर्चा होती.
उपमहापौरपदाचा
कारभार चांगला करा
याबाबत गुरुवारी डीपीसी बैठकीपूर्वी शिरसाट यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, जंजाळसारखे कुशल आणि सर्वगुण संपन्न नेतृत्व आम्हाला लाभले हे आमचे भाग्य आहे. त्यांना एवढा मोठा पदभार मिळाला आहे. खर्या अर्थाने आम्ही त्यापासून मुकलो असतो. त्यांनी तो उपमहापौर पदाचा कारभार चांगला करावा. या काळात त्यांनी चांगले काम करून भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, अशी माझी सदिच्छा आहे, अशी खोचक टिप्पणीही केली. यारून पालकमंत्री आणि उपमहापौर यांच्यातील वाद चिघळल्याचे दिसून येत आहे.












